Saturday, July 28, 2018

मराठी भाषा - फेबु - १

सर्वसाधारणपणे, चित्रपट बघायला आणि समजायला काही अक्कल लागत नाही. हिंदी चित्रपट बघितले जातात म्हणजे हिंदी बोलता, लिहिता येते किंवा समजतेच असे नाही. आपल्याकडे तेलगू चित्रपटपण जोरात चालतात, तेलुगू गाण्यांवरपण पब्लिक जबरा नाचतं! तसंच तेलंगाण्यात वाट पाहतोय रिक्षावाला, सैराटमधलं झिंगाट, ही भयानक फेमस गाणी आहेत. त्यांना मराठी समजत नाही. ज्युरासिक पार्क आणि कितीतरी चित्रपट इंग्रजीत होते, आम्ही इंग्रजीतच बघितले, त्यातली पात्रे काय बोलायची घंटा काही समजलं नाही. पण हिरो कोण, व्हिलन कोण आणि काय काड्या करणं सुरू आहे, सर्व काही कॉमन सेन्सने समजतं.

आज इंग्रजी चित्रपट बघणारे आवर्जून सबटायटल्सवाले चित्रपट बघतात. बोललेलं समजलं नाही तरी वाचून अंदाज येतो. ऍमेझॉन प्राईमवरपण सबटायटल्स वेगळे दिले जातात. सांगायचा उद्देश हाच आहे की, चित्रपट बघणे आणि ती भाषा लिहिता/वाचता/बोलता येणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हिंदी लादणारे हिंदी चित्रपट आणि त्यांची लोकप्रियता, याचंच भांडवल करून हिंदी लादत आहेत. यासाठी दोषी हिंदी चित्रपट नाहीत. भाषा लादणारे दोषी आहेत! याला मुख्य कारण एकच आहे, ते म्हणजे भारतात एकूणच भाषिक प्रश्नांच्या आणि भारतीय भाषांच्याबाबतीत असलेली असंवेदनशीलता! तसेच महाराष्ट्रात असून इतर राज्यातून/देशातून येणाऱ्या लोंढ्यांच्या सुविधेचा विचार!!! त्यांची राज्य त्यांना सांभाळल्याबद्दल महाराष्ट्राला त्यांच्या बजेटमधला हिस्सा काढून देतात का? असो हा वेगळा मुद्दा!

परंतु या लोकांना थांबवणं अशक्य आहे कारण राजकीय पक्षांना ध्रुवीकरणासाठी याचा उपयोग होतो, ते कधीही यांना बाहेर हाकलणार नाहीत किंवा थांबवणार नाहीत. फक्त आपल्यासमोर नाटकं करतील. पण आपण येणाऱ्या प्रत्येकाला मराठीतच बोल म्हणून खडसावून सांगू शकतो. मराठीत नाही बोलला म्हणून त्याची गोची करू शकतो. देशात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठी ३ नंबरला आहे, या लोकांवर आणि यांची सुविधा पाहणाऱ्यांवर नियम दाखवून दबाव आणला तर मराठी भाषिकांची संख्या अजून वाढवता येऊ शकते.
महाराष्ट्राच्या शहरी भागांमध्ये हिंदी बोलणारे आणि समजणारे तसेच काही हिंदीप्रेमी लोक असले तरीही, राज्यात राहणाऱ्या तळागाळातल्या व्यक्तीला हिंदी समजत नाही, मराठीच समजते आणि त्याला मराठी मिळावी यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे..

मराठी भाषेत सेवा, सुविधा, मनोरंजन, शिक्षण मिळणे हा प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाचा हक्क आहे.
आपला हक्क बजावा! हे तुमचं राज्य आहे!!!

#जयमहाराष्ट्र
#सुचिकांत

मराठी माध्यम - फेबु - १

ती : मी अकरावीला गेले, वर्गात शिक्षकांनी एक प्रश्न विचारला. Define म्हणजे काय मला कळाले नाही. पूर्ण वर्गातली मुले मला हसली. मी तो अपमान कधीच विसरू शकणार नाही. त्यामुळे मी माझ्या मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवणार.

मी : मी पण अकरावी विज्ञानला होतो. हवेला वस्तुमान असते का? असल्यास ते कसे मोजतात असा प्रश्न विचारला गेला. वर्गात १२० मुलं होती. त्यात दोन्ही मराठी-इंग्रजी माध्यमाची होती. कुणालाही त्याचं उत्तर जमलं नाही, किंवा सांगायचं धाडस झालं नाही. मला पण इंग्रजी बोलता येत नव्हतं. मी सरळ उठलो आणि न लाजता, सव्वाशे मुलांच्या वर्गात मराठीत सांगायला लागलो. हवा नसलेल्या फुग्याचं वजन करा, नंतर त्यात हवा भरा आणि वजन करा. दोन्हीतल्या फरकावरून तुम्हाला हवेला वस्तुमान असते हे सिद्ध होईल. मी माझ्या मुलीला मराठी माध्यमातच शिकवणार!!!
________

उगाच सतत अकरावी विज्ञानला गेल्यावर आम्हाला इंग्रजी बोलता आलं नाही म्हणून आमचा अपमान झाल्याच्या तक्रारी करून मराठी माध्यमाला नावे ठेवू नका. कोणत्या गोष्टीचा अपमान करून घ्यायचा आणि कोणत्या गोष्टीचा नाही, हे आपल्यावर आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घ्यायचा तर खुशाल घ्या. त्यासाठी मराठी माध्यमाची बदनामी नकोय. अकरावी विज्ञानला गेल्यावर शिक्षक आणी विद्यार्थी सगळे मिळून इंग्लिशमन होतात हे काहीतरी विचित्र चित्र मुद्दाम उभं केलं गेलं आहे. समजत नसेल तर जवळपास सर्वच शिक्षक विद्यार्थ्यांना लेक्चरनंतरदेखील समजावून सांगतात.

गट व्यवस्थापन - १ - आरं सोन्या तू असा हायेस तरी कोन?

विषय थोडा वेगळा आहे. नेहमीप्रमाणे सरळ मुद्द्यावर जाऊन गुद्दे देता येणार नाहीत. 'स्वभाव, आणि लोकांची मानसिकता' याची ओळख करून देऊनच मुख्य मुद्द्याला हात घालीन.
'कारकीर्दीच्या सुरुवातीला मी एका एमएनसी कॉलसेंटर मध्येच बॅकप टीम सोबत काम करायचो.' कॉल सेंटरला जेव्हा फोन केला जातो त्यावेळी बिचाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक वेळा लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागतं. इथे कटकट करणारे अगदी हेल्पलाईनला फोन लावण्यापासून कटकटीला सुरुवात करतात. तुम्हाला फोन केलाकी खूप बटनं दाबावी लागतात, अगोदर ते पहिले पर्याय कमी करा इथपासून, ही कटकट सुरु होते. मग समोरचा कॉलसेंटरचा कर्मचारी नियमाप्रमाणे ग्राहकाला काही प्रश्न विचारतो, उदा. तुमचा जन्मदिवस, भ्र.ध्वनी क्रमांक, बँकेच्या हेल्पलाईनला फोन केला तर मागची ३ ट्रांज्याक्शन्स, या सर्व गोष्टी सांगितल्याशिवाय हे कर्मचारी पुढे बोलतच नाहीत. हा नियम त्यांना घालून दिला आहे. हे कर्मचारी नियम मोडू शकत नाहीत. मग पुन्हा त्यांच्यावर जाळ काढायचा. बरं, तक्रार ऐकून घेतल्यावर जर हे कर्मचारी त्यावर स्वतः काम करू शकत नसतील तर ते सांगतात, आम्ही दुसऱ्या टीमकडे ही तक्रार पाठवतो आहोत, तिथून तुम्हाला संपर्क केला जाईल किंवा तुम्ही आमच्या स्थानिक कार्यालयात जाऊन भेटा! झालं पुन्हा काही लोकांचा पारा चढतो, मग तुम्ही कशाकरता आहात तिथे? इथपासून हमरीतुमरीपर्यंत लोक येतात. , इतका तिळपापड व्हायची काय गरज असते? समोरचा माणूस देखील तुमच्यासारखाच नोकरदार आहे ना? कॉल संपल्यावर अभिप्राय विचारण्याकरता दुसरा कॉल येतो, किंवा अभिप्राय द्या म्हणून आवाहन केलं जातं तेव्हा देखील अभिप्राय देता येऊ शकतो. या सगळ्यात त्या कर्मचाऱ्याने चुकून जरी प्रत्युत्तर दिले तरी ग्राहक, उद्दामपणे म्हणतो, तुम्हाला माहिती का मी कोण ते? हीच सर्व्हिस देता का लोकांना? कष्टमरशी असंच बोलता का? उगाच समोरचे लोक सेवा क्षेत्रात आहेत, आणि उलटं बोलत नाहीत म्हणून आपलं काहीही? 'तुला माहिती का मी कोण' असा प्रश्न जेव्हा विचारला जातो, तेव्हा खरंच मला प्रश्न पडतो, 'आरं सोन्या तू असा हायेस तरी कोन'?
'असंच काही वर्षांपूर्वी, बंगळूरुमध्ये माझ्या एका जुन्या कंपनीत हा प्रसंग घडला होता :' प्रत्येक आयटी कंपनीमध्ये लॅपटॉप/सॅक अगदी जेवणाच्या डब्याची बॅग देखील स्कॅन केली जाते. आमच्या कंपनीचा कर्मचारी, वाहनतळावर वाहन उभे करून स्कॅनिंगमशीन पाशी आला, त्याने त्याची बॅग, स्कॅन करून घेतली. मग त्याच्या लक्षात आले की त्याला एटीएम मधून पैसे काढायचे आहेत! मग तो तिथेच थोड्या विरुद्ध दिशेला असलेल्या एटीएम मध्ये गेला, पैसे काढले आणि सरळ कार्यालयात जायचा प्रयत्न करू लागला. रखवालदाराने सांगितले साहेब, पुन्हा स्कॅन करावे लागेल. रखवालदाराचे बरोबर होते, एकदा स्कॅन करून समोरची व्यक्ती कार्यालयात न जाता दृष्टीआड झाली होती, आणि म्हणूनच तो त्या कर्मचाऱ्याला नियम दाखवत होता. कर्मचारी मोठ्या पदावरचा अधिकारी, महिन्याला लाखो रुपये पगार, त्याच्याजवळ आलिशान गाडी, एकदम तालेवार. एकतर अनेकांना, स्कॅन करणे २ मिनिट्स वेळ वाया घालवणे हाच प्रकार वाटतो. ते अगोदरच नाखूष असतात. त्यात दुसऱ्यांदा स्कॅन म्हटल्यावर त्या कर्मचाऱ्याचा तिळपापड झाला. मग त्याने त्याची खरी पातळी दाखवली, हमरी तुमरीवर आला, मग मी किती मोठा आहे माहिती का? माझ्यात आणि दुसऱ्यांच्यात काहीच फरक नाही का? मग मी याला मेल लिहीन त्याला मेल लिहीन वगैरे वगैरे वगैरे.. आता तो रखवालदार त्याच्यापेक्षा कमी शिकलेला असुदे, कमी पैसेवाला असुदे, किंवा कमी ज्ञानी असुदे, त्यावेळी तिथे रखवालदारच बॉस आहे! आणि त्याचं ऐकणं हे प्रत्येकाचं काम आहे. तो ज्या टीमसोबत काम करतोय त्या सर्वांनी मिळून काही नियमावली बनवली असेल त्या नियमावलीचे पालन प्रत्येकाने करायलाच हवे. तिथे वाद घालणे म्हणजे निव्वळ बालीशपणाच ठरेल.
'हाच प्रकार सार्वजनिक क्षेत्रात काम करताना अनेकदा कमी-अधिक प्रमाणात घडतो.' सध्या असे प्रकार फेसबुक आणि व्हॉट्सऍप समूहांत सर्रास घडतात. आम्ही तर दर आठवड्यात एकाला व्हॉट्सऍप समुहातून नारळ देतो, त्याचप्रमाणे अनेक नवीन सदस्यदेखील घेत असतो. अनेकांना फेसबुक समुहातून ब्लॉक करतो. चांगले सदस्य गेले तर नक्कीच फरक पडतो, दुःख होतं पण काय करणार? तुम्ही किती मोठे ज्ञानी आहात किंवा किती तालेवार आहात, त्यापेक्षा तुम्ही समुहासाठी किती फायदेशीर आहात, समुहात राहून कशा प्रकारे योगदान देत आहात? तुमच्या विचारांच्या मांडणीमुळे काही गैरसमजांना खतपाणी तर मिळत नाहीना? तुमच्या पोस्ट्समुळे इतर दुखावले तर जात नाहीत ना? तुम्ही नियम पाळता का? तुम्हाला अपवादात्मक सूट दिली तरीही त्याचा इतर लोक गैरअर्थतर घेणार नाहीत ना? गैरफायदा घेऊन 'छुपे धार्मिक/जातीय/भाषिक/राजकीय/फुटीरतावादी' इ. अजेंडे तर राबवणार नाही ना? हे पाहणं महत्त्वाच असतं. हे सर्व करत असताना इतर सदस्य दुखावले जाऊ नयेत ही पण काळजी घ्यावी लागते, ही अक्षरशः तारेवरची कसरत असते. अनेकवेळा सांगून देखील 'फ्लिपकार्ट धमाका/इथे क्लीक करा आणि ३ जीबी डेटा फ्री मिळवा/फेसबुक समुहात सेक्स क्लिप्स पोस्ट करणे/पर्स हरवली/कागदपत्रे हरवली/एखादी व्यक्ती हरवली/लहान मुलं हरवली/' असले फेक संदेश टाकत असतील, तर अशा सदस्यांना किती वेळ समुहात ठेवायचं? नियमाप्रमाणे सांगितलेलं असतं असे संदेश तुम्हाला आले तर स्वतः फोन करून खात्री करून घ्या, की खरोखर कुणाची कागदपत्रे हरवलीत का? कुणी खरोखर हरवलंय का? पण असे न करता, आलाय संदेश पाठव पुढे, हेच तत्त्व अवलंबले जाते. पण अशा लोकांना नियम दाखवले, समुहातून काढले की लोक हमरी तुमरीवर येतात, तू कोण ? तुला माहिती का मी कोण? ही गोष्ट कुठे नियमांत आहे? मग मी चुकलो तर वैयक्तीकवर येऊन सांगना! सगळ्यांसमोर का सांगतो? औकादीत राहायचं .... तुला बघून घेईन! वगैरे, वगैरे, वगैरे ....
'काय तर क्षुल्लक फेसबुक/व्हॉट्सऍप समुहाचा प्रशासक आहे,' काय त्याला गांभीर्याने घ्यायचं असं जर वाटत असेल तर चुकताय! तो क्षुल्लक 'प्रशासक' आहे आणि तो समूह 'क्षुल्लक' असेल तर, तिथे तुम्ही का आहात? तो तुमच्या दृष्टीने क्षुल्लक जरी असला तरी तुम्हाला जे जमलं नाही/जमत नाही/जे करायचं नाही/ज्या कामात रस नाही, असं काम तो करतोय! त्याच्याकडे उत्कृष्ट संघटनकौशल्य असू शकतं जे तुमच्याकडे नाही, किंवा तुम्हाला ते वापरायचं नाही. तुमची आणि त्याची कार्यक्षेत्रे वेगळी असू शकतात! तो त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये उत्कृष्ट असू शकतो, त्यासाठी त्याला कॉलेजच्या डीग्र्यांची गरज नाही, कार्यक्षेत्रे वेगळी असूनदेखील एखाद्या विशिष्ट ध्येयासाठी तुम्ही आणि तो एकत्र आहात हे विसरू नका. आपण दिवस-रात्र 'व्हॉट्सऍप ऍडमीन' वर पडणाऱ्या वेळकाढू पोस्ट्समध्ये, चिंधी आणि थिल्लर, एकमेकांच्या जाती-धर्म-समाजाबद्दल गैरसमज आणि द्वेष पसरवणाऱ्या संदेशांमध्येच गुंग आहोत. आंतरराष्ट्रीय स्तरावर लोक याचा कसा विधायक उपयोग करतात हे आम्हाला माहितीच नाही! आम्ही ज्या मायक्रोसॉफट तंत्रज्ञानामध्ये काम करतो त्यांचे देखील आंतरराष्ट्रीय समूह असतात. तिथे केवळ तंत्रज्ञानाशी निगडीतच पोस्ट केलं जातं ... बाकी विसरूनच जा. आपल्याकडे देखील अनेक समूह उत्कृष्टपणे काम करत आहेत,याची आम्हालातर माहितीच नाही!
'माझ्या अशा अनेक लहान-थोर, समवयस्क, मित्र-मैत्रिणींना मी एकच सल्ला देईन,' सार्वजनिक क्षेत्रात, जिथे कुठे काम करताय, वावरताय, तिथले 'नियम पाळा'. नियम चुकीचे असतील तर बदलण्याकरता प्रयत्न करा, परंतु एखाद्याशी अशा प्रकारे वाद घालून स्वतःची आणि दुसऱ्याची मने कलुशीत करू नका. खिलाडू वृत्तीने घ्या. प्रत्येकजण चुकतो. चूक दाखवली म्हणजे खूप मोठा अपमान झाला असं काहीही नाही, नियमांसमोर कुणीही लहान किंवा मोठं, जवळच किंवा लांबचं नसतं. प्रत्येकजण काही नियमांना बांधील आहे, त्याला त्याचं काम नीट करुद्या, इतकेच आवाहन.
तात्पर्य : नियम पाळा, इगो टाळा, अहंकार गाळा, द्वेष-मत्सर जाळा
____________________
#सुचिकांत

प्रसंगनिष्ठ १ - गुरुपौर्णिमा आठवण...

पंडित भिमसेन जोशी आणि कुमार गंधर्व म्हणजे माझे अतिशय आवडते शास्त्रीय गायक. त्यामुळे त्यांच्याबद्दल थोडंफार मी वाचत असतो.

मागे अण्णांच्या बाबतीत असच काही वाचनात आलं होतं.. आज गुरुपौर्णिमेच्यादिवशी आठवलं.
हा किस्सा सवाई गंधर्व आणि पंडित भीमसेन जोशी यांच्याशी निगडीत आहे....

सन १९३६ मध्ये धारवाडमधील किराणा घराण्याच्या, सवाई गंधर्वांनी (पं. रामभाऊ कुंदगोळकर), स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशींना आपला शिष्य म्हणून स्वीकारलं. गुरु-शिष्य परंपरेनुसार भीमसेनअण्णा गुरुच्या घरी राहू लागले. यादरम्यान एक घटना घडली...

एके दिवशी अण्णांचे वडील मुलाचं संगीत शिक्षण कसं चालू आहे हे बघायला सवाई गंधर्वांच्या घरी पोहोचले. पुढे जे पाहिलं ते कोणत्याही बापाला अस्वस्थ करणारं होतं. अण्णांचे डोळे लाल झाले होते, श्वास घ्यायला अडचण येत होती,घामाने कपाळावरच्या नसा चमकत होत्या, अण्णा तापाने फणफणले होते.... हे पाहून त्यांच्या वडीलांनी, माझा मुलगा इतका आजारी असताना तुम्ही त्याच्याकडून कामे करून घेताय म्हणून सवाई गंधर्वांकडे तक्रार केली.

यावर सवाई गंधर्व म्हणाले, तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत आवडत नसेल तर तुम्ही आपल्या लाडक्या मुलाला घरी घेऊन जाऊ शकता. तोपर्यंत भीमसेन अण्णा तिथे आले आणि मी इथे अतिशय आनंदात आहे, तुम्ही माझी काळजी करू नका म्हणून आपल्या वडिलांना तिथून ओढून दुसरीकडे नेले.

भीमसेन अण्णा सवाई गंधर्वांच्याकडे ४ वर्षे संगीत शिकले. सवाई गंधर्व,अण्णांकडून वेगवेगळ्या रागांवर तब्बल ८-८ तास मेहनत करून घेत असत. लोकांना आपल्या गुरुचे कौतुक सांगताना अण्णा आपल्या गुरूची महती आणि स्वतःची पाठदेखील दाखवायचे. अण्णा म्हणायचे मला संगीताचं ज्ञान फक्त रियाझ करून मिळालेलं नसून माझ्या गुरुसाठी तलावातलं कित्येक हंडे पाणी भरून मिळालेलं आहे. याच शिष्याने आपल्या गुरुच्या स्मृतीप्रीत्यर्थ पुण्यात 'सवाई गंधर्व संगीत महोत्सव' सुरु केला.